टाइमपास या सिनेमातून घराघरात पोहोचलेला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब आज २४ फेब्रुवारी रोजी बोहल्यावर चढला. क्षितीजा घोसाळकरसह सात फेरे घेऊन त्याने आता आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. सध्या प्रथमेशच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यातच लक्ष वेधलं आहे ते म्हणजे प्रथमेशची बायको क्षितीजाच्या खास मंगळसूत्रानं. क्षितीजाच्या मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रथमेशने लग्नाचे फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. यात दिसत की, क्षितिजानं मंगळसूत्राची डिझाइन अत्यंत आधुनिक ठेवली आहे. काळे मण्याचं ते असं घसघशीत मंगळसूत्र आहे. विशेष म्हणजे तिच्या मंगळसूत्रात Infinity चे चिन्हही आहे. क्षितिजाच्या गळ्यात असलेलं हे मंगळसूत्र सोन्याचं असून ते खूपच आकर्षक दिसत आहे. तिच्या या आधुनिक मंगळसुत्राला पारंपरिक पद्धतीचा टच देण्यात आला आहे. लग्नासाठी प्रथमेशने गुलाबी रंगाचं धोतर, पांढरा कुर्ता आणि फेटा असा पारंपरिक लूक केला होता. तर क्षितीजा पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत नटली होती.
काही वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितीजाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दगडूला खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाल्याने चाहतेही खूश आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला केळवणाचा फोटो शेअर करत प्रथमेशने आपल्या चाहत्यांना लवकरच लग्न करणार असल्याची हिंट दिली होती. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या मुलाखती देऊन त्यांच्या लव स्टोरी बद्दल सांगितले.
इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. एका फोटोशूटवर प्रथमेशने कमेंट करुन तिला मेसेज केलेला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रथमेश आणि क्षितीजा अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.