Join us  

आता आपण फक्त दिवस मोजायचे...! प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 5:31 PM

Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंची नवीन सिनेमासंदर्भातील पोस्ट चर्चेत, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘सरसेनापती हंबीरराव’

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य  गाथा अख्खा महाराष्ट्र जाणून आहे. हंबीररावांनी महाराजांसमवेत अनेक मोहिमा फत्ते करून मराठा साम्राज्याची पाळमूळ घट्ट करण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. हंबीरराव मोहिते यांचा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. कधी तर? आजपासून 75 दिवसांनी...

दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे ( Pravin Tarde)  हे हंबीरराव मोहिते यांच्यावर बेतलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao)   हा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मुहूर्तही ठरला आहे. प्रविण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.

‘सरसेनापती हंबीरराव’चं नवं पोस्टर त्यांनी शेअर केलं. ‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट,’ असं या पोस्टरवर लिहिलेलं आहे. या पोस्टरमध्ये प्रविण यांचा जबरदस्त लुक पाहायला मिळतो आहे. ‘आता आपण फक्त दिवस मोजायचे... 75 राहिले,’ असं कॅप्शन देत त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. त्यानुसार, ‘सरसेनापती हंबीरराव’  हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे. 

 ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहे.  

टॅग्स :प्रवीण तरडेसिनेमा