गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचं अखेर निधन झालं आहे. आज सकाळी 5.07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली असून सामान्यांपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्येच अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Vitthal Tarde) यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना खास शैलीत आदरांजली वाहिली आहे.
प्रविण तरडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाबासाहेब पुरंदरे दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रविण तरडे यांनी लक्ष वेधून घेणारं कॅप्शन दिलं आहे.
"जे शिवमहात्म आमच्या मनांत कानात पेरलत , ते स्वर्गस्थ देवदेवतांना ही ऐकवा .. बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा", असं कॅप्शन देत प्रविण तरडेंनी बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली आहे. प्रविण तरडेंप्रमाणेच अभिनेता सुबोध भावेनेदेखील बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांच अलौकिक चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असं म्हणत सुबोध भावेने बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी निधन झाले.