मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता आणि अभ्यासू दिग्दर्शक म्हणजे प्रियदर्शन जाधव. आपल्या कलागुणांच्या जोरावर प्रियदर्शनने कलाविश्वात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तो कायम चर्चेत असतो. अलिकडेच त्याने 'राजश्री मराठी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
प्रियदर्शन १० वीत असताना नापास झाला होता. त्याचा रिझल्ट हातात पडल्यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती हे त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. "माझं संपूर्ण बालपण कोल्हापुरात गेलं. माझ्या घरातले सगळेच अभ्यासात हुशार होते. पण, मी अनेकदा गटांगळ्या खालल्या. मी दहावीत असताना नापास झालो. पण, माझ्या घरच्यांनी मला कधीच ते जाणवू दिलं नाही. किंवा, टोचून बोललेदेखील नाहीत. दहावीत नापास झाल्यावर वृत्तपत्रात मुंबईत 'पटवर्धनांची अभिनयाची कार्यशाळा' अशी जाहिरात छापून आली होती. मी त्या कार्यशाळेत भाग घेतला. ऑक्टोबरमध्ये येऊन परत १० वीचा पेपर दिला आणि त्यात पास झालो. त्यानंतर मुंबईत जो आलो तो परत कोल्हापूरला गेलो नाही", असं प्रियदर्शन म्हणाला.
दरम्यान, प्रियदर्शनने मराठी कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. तर, काही सिनेमांचं दिग्दर्शन सुद्धा केला आहे. लवकरच त्याचा ‘किर्रर्रर्र काटा किर्रर्रर्र’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.