मराठी अभिनेतापुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. कॉमेडी भूमिकांमधून त्याला विशेष ओळख मिळाली. सूत्रसंचालक म्हणूनही तो लोकप्रिय आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुष्कर श्रोत्री होस्ट म्हणून असतो. दरम्यान इंडस्ट्रीत इतके वर्ष काम केल्यानंतरही त्याच्यावर अन्याय झाला आहे. पुष्करला म्हणावे तितके पुरस्कार मिळाले नाहीत याची खंत त्याने स्वत:च व्यक्त केली आहे. तसंच याला तो स्वत:च जबाबदार असल्याचंही त्याने मान्य केलं आहे.
'कॉकटेल स्टुडिओ' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर म्हणाला, "अन्याय आहे पण मीच स्वत:वर तो केलाय. मी स्वत:ला लोकांसमोर योग्य पद्धतीने पोर्ट्रे केलं नाही. रेगे मधल्या भूमिकेसाठी मला अनेक अवॉर्ड मिळाले.राष्ट्रीय पुरस्कारही मिळेल असं वाटत होतं पण तो मिळाला नाही. सिटीझन सिनेमात एकच सीन केला होता त्यासाठी मला अवॉर्ड मिळालं. मला अनेक नॉमिनेशन मिळाले पण असे फार अवॉर्ड्स नाही मिळाले. अनेक शोमध्ये होस्ट करत असताना मी इतरांसाठी अवॉर्ड घोषित केले पण मलाच अजून अवॉर्ड मिळाले नाही."
"मला वाटतं की मीच स्वत:ला योग्य पद्धतीने समोर ठेवलं नसेल तर मला कसे अवॉर्ड मिळणार. रेगे सारखी भूमिका केल्यानंतर लोकांना परत असं वाटलं पाहिजे ना की याला अशा प्रकारच्या भूमिका ऑफर केल्या पाहिजेत. पण मला परत अशा भूमिका आल्याच नाहीत. ते मिळवण्यासाठी मीही स्वत:मध्ये काही बदल केले नाहीत. माझ्याकडे विनोदी भूमिकाच केल्या त्यामुळे मीच त्याच करत गेलो. अभिनेत्याने सर्वप्रकारच्या भूमिका केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने माझ्या वाट्याला अशा फार मोजक्या भूमिका आल्या ज्यात माझ्या अभिनयाचा कस लागला. पुरस्कार वाट्याला आले नाहीत. पण म्हणून काही तिरस्कारही आले नाहीत. जे केलं त्यात आनंद वाटला. पण माझ्यातला अभिनेता जागा होईल अशी कोणतीतरी भूमिका मला मिळावी असं मला वाटतं. पण अशा भूमिका मिळवण्याची कला माझ्यात नाहीए."