Join us  

'मुलांमुलींकडे लक्ष आहे का?' पुणे ड्रग्स प्रकरणावरुन पिट्या भाईचा सवाल; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:11 AM

पुणे शहरात हे काय चाललंय असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात सध्या तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली दिसत आहे. दर दिवशी वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी फर्ग्युसन रोडवरील एका पबमध्ये ड्रग्स सेवन झाल्याची चर्चा असतानाच काल पुणे नगर मार्गावरील एका नामांकित मॉलमध्ये दोन मुली वॉशरुममध्ये ड्रग्स सेवन करताना आढळून आल्या. या सर्व प्रकरणांवर अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi)  म्हणजेच सर्वांचा पिट्या भाई याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता रमेश परदेशी पुण्याचाच आहे. पुणे शहरात हे काय चाललंय असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. तो लिहितो, "आधी ललित पाटील,आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्स पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूममध्ये ह्या तरुणींचे ड्रग्स सेवन. हेच अश्या प्रकारचं वास्तव मी काही महिन्यापूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केलं ते तर पब्लिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आणि आता ह्या बाथरूम मध्ये हे करतायत बिनधास्त. आणि त्यांचं सार्वजनिक आयुष्य कस धोक्यात आणले ही तक्रार करून माझं माझ्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य घालावलं, असो. आपले आपल्या शहराकडे  आपल्या आणि आजुबाजूला असणार्‍या मुलांमुलींकडे लक्ष आहे का? आपण लक्ष देणार आहोत का? फक्त प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? आणि करणार असाल तर डोळे, कान उघडे करून फिरा. सगळे जण मिळून  छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगराने नांगरलेल्या पावित्र पुण्यभूमीला जपू...मी पुणेकर माझं शहर माझा अभिमान... माझी जबाबदारी...(कृपया राजकीय कमेन्ट नको)"

रमेश परदेशीने काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका टेकडीवर ड्र्ग्सच्या धुंदीत असलेल्या दोन तरुणींचा व्हिडिओ शूट केला होता. तेव्हा तरुणींचे चेहरे ब्लर न केल्याने त्याच्यावरच टीका झाली होती. तरी पुण्याचं आता 'उडता पंजाब'सारखं होऊ नये अशीच सर्वजण आशा व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :पुणेअमली पदार्थमराठी अभिनेतासोशल मीडिया