Join us

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुदलापुढे नतमस्तक झाले मराठी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 7:17 PM

बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील वायुसेनेचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देसुरुची अराडकर सांगते, भारताने या कारवाईद्वारे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या सैनिकांनी दिलेली आहुती वाया गेली नाही. या हल्ल्यानंतर आपल्या देशाचा, सैनिकांचा मला खूप अभिमान वाटतोय. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आत्तापर्यंत सर्वांत मोठी कारवाई आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत जवानांवर केलेल्या हल्ल्याला चोख उत्तर दिलं आहे. 

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादींना ठार करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे. या कारवाईनंतर भारतीय वायूसेना, सैन्य आणि सरकारचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूडही यात मागे नाही. अनुपम खेर, परेश रावल, मुग्धा गोडसे, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान अशा अनेक बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना सलाम केला आहे. 

बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील वायुसेनेचे आभार मानले आहेत. सुरुची अराडकर सांगते, भारताने या कारवाईद्वारे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या सैनिकांनी दिलेली आहुती वाया गेली नाही. या हल्ल्यानंतर आपल्या देशाचा, सैनिकांचा मला खूप अभिमान वाटतोय. 

सिद्धार्थ बोकडे सांगतोय, पुलवामा हल्ल्यानंतर प्रचंड चीड येत होती. आपण काहीच करू शकत नाही याचा राग येत होता. पण आता वायुदलाने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर प्रचंड आनंद होत आहे. 

तितिक्षा तावडे सांगतेय, जवान आपल्यासाठी जगत असतात. त्यांचे आयुष्य हे अतिशय बिकट असते. आपल्यासाठी ते कुटुंबियांपासून दूर राहातात. या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रचंड वाईट वाटत होते. मी या कारवाईसाठी भारतीय वायूदलाचे आभार मानते. 

सुयश टिळक सांगतो, दहशतवादी हल्ल्यांना आपण शांतपणे सहन करतो असे वाटणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणे गरजेचे होते. आज आपण केलेला हल्ला हा त्यालाच प्रत्युत्तर आहे. आपल्या भारतीय जवानांना सलाम.

यशोमन आपटे सांगतो, सकाळी बातमी वाचल्यावर मला प्रचंड आनंद झाला. भारताने योग्य उत्तर दिले आहे. 

विवेक सांगळे सांगतो, आजच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या सगळ्यांना याचा बदला घेतला पाहिजे असे वाटत होते. आज वायुदलाने आपल्या जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. 

 

टॅग्स :एअर सर्जिकल स्ट्राईक