सचिन पिळगांवकर गेली अनेक वर्षं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आज मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांनी त्यांचे स्थान निर्माण केले आहे. सचिन पिळगांकर सध्या युट्युबवरील त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ हे गाणे सोशल मीडियावर काहीच दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाऊंटवरून १६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे सचिन पिळगांवकर यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. मुंबईच्या जीवनशैलीवरील असलेले हे गाणे स्वतः सचिन पिळगांवकर यांनी गायले आहे. या गाण्याची शब्दरचना, या गाण्याचे संगीत आणि या गाण्याचे विनोदी पद्धतीने करण्यात आलेले चित्रण यामुळेच हा व्हिडिओ ट्रोल होत आहे. या गाण्याची शब्दरचना ही मोहम्मद अकील अन्साली यांचे असून व्हिडिओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे.
या व्हिडीओखालील डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिओविषयी लिहिण्यात आले आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हीच वैशिष्ट्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’ पण या गाण्यावरून नेटिझन्सने सचिन पिळगांवकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या गाण्यावर एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. एका युझरने लिहिले आहे की, इतकं दलिंदर गाणं यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं... सचिन पिळगावकरने आयुष्यभर कमावलेली सगळी इज्जत अब्रू घालवली, अरे भोजपुरी गाणी पण याच्यापेक्षा भारी असतात रे... तर एका युझरने लिहिले आहे, सचिन साहेब पैशाची टंचाई असेल तर सांगा आम्ही निधी गोळा करतो... पण प्लीज परत असा अत्याचार करू नका...सचिन पिळगांवकरच्या असल्या वागण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आलेला सुवर्णकाळ जाऊन परत तांब्या-पितळ्याचे दिवस येतील असे एका युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे.