मराठी सिनेसृष्टीला सुवर्णकाळ दाखवणारी दिग्गज जोडी म्हणजे महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर. 'अशी ही बनवाबनवी', 'आत्मविश्वास', 'गंमत जंमत' अशा सिनेमांमधून सचिन पिळगावकरांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. तर दुसरीकडे 'झपाटलेला', 'धूमधडाका', 'थरथराट', 'पछाडलेला' अशा सिनेमांमधून महेश कोठारेंनी वेगळ्या धाटणीचे विनोदी सिनेमे दिग्दर्शित करुन स्वतःची वेगळी छाप सोडली. महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांनी एकत्र कधी काम केलं नाही. परंतु महेश कोठारेंकडून सचिन यांनी कोणती गोष्ट टिपली, याचा खुलासा त्यांनी केलाय.
महेश कोठारेंबद्दल सचिन पिळगावकर काय म्हणाले?
माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, "मी महेश सोबत कधी काम केलं नाही. पण त्याचे सिनेमे बघून मी त्याची प्रशंसा नक्कीच करु शकतो. मला खूप आवडतात महेशचे चित्रपट. माझ्या मते थरथराट हा महेशचा नंबर वन पिक्चर आहे. महेशची पिक्चर बनवण्याची स्टाईल वेगळी आहे आणि माझी एक स्टाईल वेगळी आहे." अशाप्रकारे सचिन पिळगावकर यांनी महेश कोठारेंच्या कामाबद्दल त्यांचं मत मांडलं.
सचिन पिळगावकरांचं वर्कफ्रंट
सचिन पिळगावकर यांनी ८० - ९० च्या काळात 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत', 'आत्मविश्वास', 'नवरा माझा नवसाचा' या मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करुन मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. सचिन पिळगावकरांनी त्यांच्या करिअरमध्ये 'शोले', 'बालिका वधू', 'अँखियों के झरोंके से', 'माझा पती करोडपती', 'रणांगण', 'शर्यत', 'कट्यार काळजात घुसली' या हिंदी-मराठी सिनेमांमधून विविधरंगी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.