मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे सोशल मीडियावर बेधडकपणे व्यक्त होत असतात. यात समाजात घडलेली कोणतीही गोष्ट खटकली की हे सेलिब्रिटी त्यावर उघडपणे भाष्य करतात. यात अलिकडेच अभिनेता समीर खांडेकर याने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेसंदर्भातील सुचनेबद्दल जाब विचारला आहे. सोबतच त्याने एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीये.
सोयीसुविधांनी सज्ज असलेली तेजस एक्स्प्रेस कायमच चर्चेत असते. यात बऱ्याचदा तिच्यात देण्यात येणाऱ्या उत्तम सर्व्हिसमुळे ती चर्चेत येते. मात्र,यावेळी या एक्स्प्रेसमध्ये मराठीची गळचेपी केल्यामुळे चर्चेत आली आहे. या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सुचनेसाठी देण्यात येणाऱ्या पाट्यांवर मराठी अत्यंत चुकीचं, दिशाभूल करणारं असल्यामुळे समीरने ही पोस्ट शेअर केली आहे. सोबतच असं मराठी लिहिण्यापेक्षा एखाद्या चौथीच्या मुलाकडून या पाट्या लिहून घ्या असा टोमणेवजा सल्लाही त्याने दिला आहे.
समीर खांडेकरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘तेजस एक्सप्रेस’मध्येही सूचना सांगणाऱ्या एका डिजिटल बोर्डचे काही फोटो त्याने पोस्ट केले आहेत. या बोर्डवर अत्यंत चुकीच्या भाषेत मराठी लिहलेली आहे. यात ‘तुमची आपल्या वस्तू एका बाजूला ठेवू नये’,‘कृपया चालू गाडीमध्ये चडू नये,’‘कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे,’ ‘ही रेल्वे छ. शिवाजी महाराज स्टेशन वासून मडगांव स्टेशन पर्यंत जाणार आहे,‘ अशा चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेत पाट्या लिहिल्या आहेत. त्यामुळे समीर चांगलाच चक्रावून गेला.
समीरने दिला रेल्वे प्रशासनाला सल्ला
समीरने हा व्हिडीओ पोस्ट करण्यासोबतच त्याच्या कॅप्शनमध्ये रेल्वे प्रशासनाला टॅग केलं आहे. सोबतच कॅप्शनमध्ये त्याने सल्ला दिला आहे. “आम्ही Dome मधून बाहेर बघण्यातच रमलेलो असतो. प्रिय, इंडियन रेल्वे, मराठी माध्यमातल्या ४ थीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी चाललं असतं! या सूचना ज्यांनी कुणी लिहिल्या आहेत त्यांना दंडवत. कृपया, वेळीच त्यात बदल करा”, असे समीर खांडेकरने म्हटले आहे.
या पोस्टच्या पुढेच कमेंटमध्ये त्याने आणखी एक मेसेज लिहिला आहे. त्यानुसार, “मित्र/ मैत्रीणींनो खूप लाइक्स आणि फॉलोअर्स मिळावेत म्हणून हा व्हिडिओ पोस्ट नाही केलाय. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संबधित हॅंडलला ट्वीट करुन या Tejas Express मधल्या चुकीच्या ‘मराठी सूचनांची’ दखल घ्यायला भाग पाडा”, असेही आवाहन म्हटले आहे.