अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड लागलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालख्या, दिंड्या आणि वारकरी टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत पंढरीकडे (Pandharpur) निघाल्या आहेत. ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी मराठी अभिनेता संदीप पाठकदेखील वारीत सहभागी झाला आहे.
मराठी चित्रपट, नाटक व मालिका अशा सर्व माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार अभिनेता संदीप पाठक वारकऱ्यांसोबत रमला आहे. या वारी सोहळ्यातील काही खास क्षण त्याने टिपले आहेत. वारीतील विविध फोटो आणि व्हिडीओ संदीप पाठकने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये वारीचे सुंदर असं रुप पाहायला मिळत आहे.
हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जात आहेत. संदीपने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो वारकऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहे. तुकारामांचे अभंग, माऊलींचे अभंग अशा निरनिराळ्या गोष्टी व्हिडीओंमध्ये भक्तांना पाहायला मिळत आहेत. संदीप पाठक गेली अनेक वर्षे या वारी सोहळ्यात सहभागी होत आहे. एवढंच नाही तर त्याच जगात भारी पंढरीची वारी हे गाणे देखील प्रदर्शित झालं आहे.
यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. एका सिद्धांतानुसार, वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली होती. वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.