Join us

वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 14:26 IST

Sandeep pathak: संदिप कायम वारीमध्ये त्याला आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

सध्या संपूर्ण देशात विठ्ठलमय वातावरण झालं आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात वारकऱ्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण विठ्ठलाच्या भक्तीरसात न्हाऊन गेला आहे. यामध्येच अभिनेता संदिप पाठक याची एक मुलाखत चर्चेत आली आहे. वारीत सहभागी होणाऱ्या एका वारकऱ्याचा किस्सा त्याने सांगितला आहे. 

गेल्या कित्येक वर्षांपासून संदिप नित्यनियमाने वारीत सहभागी होतो. यावेळी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अनुभव आले. यापैकीच एका अनुभव त्याने शेअर केला. दोन वर्षापूर्वी त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने वारीत सहभागी होणारे वारकरी किती साधेभोळे असतात हे सांगितलं.

"ज्ञानोबा आणि तुकोबा या दोघांची वारी मी अनुभवली आहे. एकदा चहा प्यायला बसलेलो असताना तिथं बाजूलाच एक ७५-८० वर्षीय वारकरी बसले होते. त्यांना चहा देत मी विचारलं, 'माऊली, तुमच्याकडं काही बॅग वगैरे काहीच नाही. मग १८ दिवस कसं काय जमणार ?' तर त्यांनी मला एक पिशवी दाखवली आणि, आपल्याला काय लागतंय एक जोडी कपडे. नदीत धुवायची, वाळवायची आणि वाळून झाली की निघायचं माऊलीकडं', असं उत्तर या वारकऱ्यांनी दिलं", असं संदिप म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "त्यांनी हे उत्तर दिल्यानंतर मी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला. 'या वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का?' त्यावर त्यांचं उत्तर, 'दिलेत की...१४० रुपये.' 'एवढ्यानं भागणार का सगळं', असं मी पुन्हा विचारलं. त्यावर ते म्हणाले, 'भागणार म्हणजे उरतील यातून काही पैसे. आता तुमच्या सारख्या माऊलीनं चहा पाजला. या वारीत सगळं मिळतं. त्यांच्या पायात चप्पल नव्हती. ते म्हणाले, 'मी वारीला अनवाणीच येतो, माऊलीच्या ध्यानात पायाला काय रुतेल काय लागेल याची मला कधीच जाणीव झाली नाही."

दरम्यान, या वारकऱ्यांचं बोलणं ऐकून संदिप एकदम स्तब्ध झाला. दोन मिनिटं त्याला काय बोलावं काहीच सुचलं नाही. संदिप गेल्या चार वर्षांपासून वारीमध्ये सहभागी होत आहे. तसंच वारीमध्ये येणारे अनुभवदेखील तो वेळोवेळी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

टॅग्स :आषाढी एकादशीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा