बॉलिवूडमध्ये 'छावा' सिनेमाने यावर्षी तब्बल ५०० कोटी पार कमाई केली आहे. विकी कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमाचं खूप कौतुक झालं. आपला मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) या ब्लॉकबस्टर सिनेमात झळकला. रायाजी मालगे ही व्यक्तिरेखा त्याने साकारली. त्या काळातील आणखी कोणत्या व्यक्तिरेखांवर सिनेमा बनावा यावर संतोषने उत्तर दिलं आहे.
संतोष जुवेकर सध्या मराठी, हिंदी सिनेइंडस्ट्रीत चर्चेत आहे. 'छावा' च्या यशानंतर संतोषचाही भाव वधारला आहे. नुकतंच त्याने मराठी कलाकारांसोबत होळी पार्टीला हजेरी लावली. यावेळी 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मला एवढंच म्हणायचं आहे की आपला इतिहास सर्व महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला कळावा. कारण तो खूप खूप मोठा इतिहास आहे. संताजी आणि धनाजींवर सिनेमा यावा अशी माझी इच्छा आहे. मी त्यात असेन नसेन पण सिनेमा नक्की यावा."
'छावा'च्या यशावर आणि ट्रोलिंगवर संतोष म्हणाला, "केवळ महाराजांची कृपा आहे आणि अर्थात आमच्या सर्व टीमची ही मेहनत आहे. ट्रोलिंगचं सांगायचं तर मी फक्त चांगल्या गोष्टींकडे पाहतो आणि त्याच स्वत:कडे ठेवतो."
'छावा' नंतर आता संतोष आणखी एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. अनुराग कश्यपच्या सिनेमात तो झळकणार आहे. शिवाय त्याचे २ मराठी सिनेमेही येणार आहेत.