Join us

'छावा'च्या शेवटी प्रेक्षकाने थिएटरमध्ये पडदाच फाडला, संतोष जुवेकर म्हणाला, "आपण काय करतोय..."

By ऋचा वझे | Updated: February 18, 2025 18:06 IST

अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमात रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' (Chhaava) हिंदी सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा विलक्षण प्रतिसाद मिळत आहे. थिएटर गच्च भरले आहेत.  अनेक लोक सिनेमा संपल्यावर भावनाही मांडत आहे, अक्षरश: रडत आहेत. अगदी चिमुकलेही सिनेमा पाहून भावुक झालेत. दरम्यान काही प्रेक्षकांची भावना नियंत्रणाबाहेर गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकाने सिनेमाच्या शेवटच्या सीनला थिएटरमधील स्क्रीनचा पडदाच फाडला आहे.  यावर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमात रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे. सिनेमाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून तो भारावला आहे. मात्र थिएटरमधला स्क्रीनचा पडदा फाडणं अशा घटनेवर मत व्यक्त करत तो म्हणाला, "भावनेच्या भरात कृपया असं काही करु नका. इतर कोणाला करु देऊही नका. पडद्यावर आपले राजे आहेत. तसंच थिएटरवर पोट असणारे अनेकजण आहेत. अनेकांची मेहनत आहे. कोणाच्या पोटावर लाथ मारु नका. नुकसान होईल असं काहीही करु नका. मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण आपण काय करतोय यावरही नियंत्रण ठेवा. राजांच्या जे शिकवलं आहे त्यावर, त्यांच्या विचारांवर आपण चालायचं आहे हे लक्षात असून द्या." संतोष काही वेळापूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह आला. यावेळी त्याने ही प्रतिक्रिया दिली.

'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. पहिल्या तीनच दिवसात सिनेमाने १३० कोटी कमावले. सध्या जो तो याच सिनेमाबद्दल बोलताना दिसतोय. विकी कौशलच्या अभिनयाचं भरपूर कौतुक होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला त्याने न्याय दिला आहे. लक्ष्मण उतेकरांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.

टॅग्स :संतोष जुवेकर'छावा' चित्रपटविकी कौशलबॉलिवूडनाटक