'छावा' (Chhaava) सिनेमामुळे मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या चर्चेत आहे. त्याने सिनेमात रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे. संतोषने अनेक मुलाखतींमधून 'छावा'चा अनुभव सांगितला. अक्षय खन्नाशी मी बोललो नाही असंही तो म्हणाला. मात्र नुकतंच एका व्लॉगमध्ये त्याने यावर स्पष्टीकरणही दिलं. आता संतोष ने 'छावा' सिनेमा त्याच्या आयुष्यातला किती महत्वाचा सिनेमा आहे याबद्दल सांगितलं.
युट्यूबर करण सोनावणेच्या व्लॉगमध्ये संतोष जुवेकर म्हणाला, "छावा कादंबरीमध्ये १८ प्रकरणं आहेत. १८ प्रकरणांची कादंबरी अडीच तासात बसू शकत नाही. हा सिनेमा महाराजांचं शौर्य, बलिदान, त्याग याबद्दल आहे. १२७ लढायांपैकी आपण सिनेमात ९ लढाया दाखवल्या. सगळ्या दाखवण्यासाठी तर सीरिजच करावी लागली असती. त्यामुळे आमच्या वाट्याला जे आलं त्यात आम्ही १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला."
तो पुढे म्हणाला, "मुळात मी हेच म्हणतो की या सिनेमात मला काम करायला मिळालं हे मी माझं नशीब समजतो. याआधीही मी बरेच सिनेमे केले. यानंतरही करेन. पण 'छावा' सिनेमा माझ्याकरिता ध्रूवताऱ्याच्या स्थानी आहे. मी मनापासून सांगतो हा आमच्यासाठी सिनेमा नाहीए. दिग्दर्शक, लेखक, कलाकार सर्वांनी मिळून छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मंदिरातल्या भिंतीतली छोटीशी वीट होण्याचं भाग्य मला लाभलं आहे."
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यासोबत सिनेमाने अनेक रेकॉर्ड रचले आहेत. विकी कौशलने सिनेमासाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसली. सध्या अख्खा देश विकी कौशलचा चाहता झाला आहे.