Join us

"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 17:58 IST

सयाजी शिंदे यांनी जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत भाग घेतला

मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमा गाजवणारे सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. सयाजी शिंदेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने सर्वांनाच चकित करुन सोडलं. सयाजी शिंदेंनी पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी राष्ट्रवादीच्या रॅलीमध्ये भाग घेतला. आज जुन्नरमध्ये अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सयाजी शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी फोटो पोस्ट करुन त्यांच्या भावना शेअर केल्या. 

सयाजी शिंदेंनी सोशल मीडियावर रॅलीचे फोटो शेअर करुन लिहिलंय की, "जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ...!आज जुन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिलो. यावेळी एनसीपीने आयोजित केलेल्या रॅलीला जुन्नरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या रॅलीत माझ्यासह राष्ट्रवादीवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. गेल्या पाच वर्षांतील जुन्नरच्या विकासकामांच्या जोरावर, जुन्नरमधील मतदार अतुल बेनके यांना पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!"

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. तशातच  मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी  अजित पवारांच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला. सयाजी शिंदे यांनी अभिनयक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. सयाजी शिंदेंना पक्षप्रवेशासोबतच राष्ट्रवादी पक्षात विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक करण्यात आले.

टॅग्स :सयाजी शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार