Join us

Shreyas Talpade: श्रेयस तळपदे घरच्या बाप्पाचं विसर्जन करत नाही..., तुम्हाला माहितीये का यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 4:23 PM

Shreyas Talpade: श्रेयसने गणेशोत्सवाच्या अनेक आठवणी शेअर केल्यात. घरच्या गणपती बाप्पाचं आम्ही विसर्जन करत नाही, असंही त्याने सांगितलं.

नेहमीप्रमाणे यंदाही बाप्पा मोठ्या थाटामाटात विराजमान झालेत आणि बघता बघता आता त्यांच्या निरोपाची वेळ आली. अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झालेत. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याच्या घरीही बाप्पांचं आगमन झालं. यानिमित्ताने श्रेयसने गणेशोत्सवाच्या अनेक आठवणी शेअर केल्यात.आमच्या घरच्या गणपती बाप्पाचं आम्ही विसर्जन करत नाही, असंही त्याने सांगितलं.

 ‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला, ‘मी जेव्हा नवीन घर घेतलं तेव्हा आम्ही घरी बाप्पाला आणण्याचं ठरवलं होत. त्यानंतर सलग सात वर्ष आमच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा विराजमान व्हायचा. पण मधल्या काळात माझे बाबा आम्हाला सोडून गेलेत. तेव्हा मी फार चिडलो होतो. ज्या पद्धतीनं सगळं झालं ते माझ्यासाठी फारच धक्कादायक होतं. त्यामुळे मी चिडून यापुढे घरी गणपती बसवायचा नाही, असे सांगितलं. नंतर मला मुलगी झाली. तिने घरी गणपती बाप्पांना आणूया असा हट्टच धरला आणि तिच्या हट्टामुळे आम्ही गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा गणपती बाप्पा आणायला सुरुवात केली. पण घरच्या बाप्पाचे आम्ही कधीच विसर्जन करत नाही. याला कारण आहे माझी मुलगी.

मुलगी झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाप्पाला घरी आणलं. त्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाच्या काही तास आधी तिने शेजाऱ्यांकडील बाप्पाचं विसर्जन पाहिलं. आमचीही बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू होती. हौद तयार झाला होता. पण अचानक माझी लेक आली आणि  डॅडा आपण बाप्पाचं विसर्जन करायचं नाही, असं म्हणाली. आम्ही तिला अनेक परीने समजावलं पण तिने प्रचंड गोंधळ घातला. यानंतर आम्ही घराच्या बाप्पाचं विसर्जन करायचं नाही असं ठरवलं. विसर्जनाच्या दिवशी आम्ही बाप्पांच्या पायाला माती लावून त्या मातीचं विसर्जन करतो आणि मूर्ती घरीच ठेवली जाते. त्या मुर्तीला दरवर्षी रंगरंगोटी करुन पुन्हा त्याच मूर्तीची पूजा केली जाते. माझी लेक घरी ठेवलेल्या त्या बाप्पाला दररोज  गुड मॉर्निंग बाप्पा, गुड नाइट बाप्पा म्हणते.

टॅग्स :श्रेयस तळपदेमराठी अभिनेतासेलिब्रिटी गणेशगणेशोत्सव