मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar). आजवरच्या कारकिर्दीत सिद्धार्थने अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याचा 'झिम्मा 2' हा सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे तो सातत्याने चर्चेत येत आहे. सिद्धार्थने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कलाविश्वात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांविषयी भाष्य केलं आहे.
आजही इंडस्ट्रीत एखादा पुरस्कार सोहळा असेल तर प्रेक्षक मोठ्या आवडीने तो पाहतात. या सोहळ्यांमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. इतकंच नाही तर ग्लॅमरस दिसण्याची तर अभिनेत्रींमध्ये चढाओढ लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये पुरस्कार सोहळे होत आहेत. परंतु, या सोहळ्याची क्रेझ आता सेलिब्रिटींना फारशी न राहिल्याचं सिद्धार्थने त्याच्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाला सिद्धार्थ?
याआधी जे पुरस्कार सोहळे व्हायचे ते खूपच भारी असायचे. टीव्हीसमोर बसून असे सोहळे आपण स्वत: पाहायचो किंवा नॉमिनेशन जाहीर झाल्यावर आपल्या मनात उत्सुकता निर्माण व्हायची. पण, आता ती उत्सुकता राहिलेली नाही. जो त्यांचा आवडता असतो त्याला पुरस्कार मिळतो हे प्रेक्षकांनाही समजलंय, असं सिद्धार्थ म्हणाला.
दरम्यान, आजवरच्या कारकिर्दीत सिद्धार्थने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अग्निहोत्र या मालिकेतील त्याची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर तो झेंडा, क्लासमेट, गुलाबजाम, झिम्मा, झिम्मा 2, श्रीदेवी प्रसन्न अशा कितीतरी लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे.