मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) स्वत: ची एक वेगळी आणि खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. आतापर्यंतच्या करिअरमध्ये सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. सिद्धार्थच्या अभिनयाने चित्रपट फक्त खास होत नाहीत तर धमाकेदार कमाई देखील करतात. सिद्धार्थ आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवतो. प्रेक्षक सिद्धार्थच्या चित्रपटांवर प्रेम करतात. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. यासाठी सिद्धार्थने बराच मोठा स्ट्रगल केला.
अलीकडे ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर तो आपल्या स्ट्रगलबद्दल बोलला होता. ‘माझे वडील दादर येथील प्लाझा थिएटरबाहेर पेपर टाकून झोपायचे. आज त्याच थिएटरसमोर माझं घर आहे...,’ हे सांगताना सिद्धार्थला अश्रू अनावर झाले होते. ‘माझ्या वडिलांना माझा खूप जास्त अभिमान वाटतो,’ असंही तो म्हणाला होता. आता सिद्धार्थच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या चाहत्यांनाही त्याचा अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली आहे.
होय, एका ब्रँडने चक्क सिद्धार्थ जाधवच्या कपड्यांचं कलेक्शन लाँच केलं आहे. सिद्धार्थने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.पोस्टमध्ये तो लिहितो,‘ माझं वाढदिवसाचं गिफ्ट. तसे नवीन नवीन कपडे घालायला लहानपणापासूनच मला आवडायचं. पण नवीन कपडे फक्त दिवाळी, वाढदिवस किंवा शाळेत जाताना मिळायचे. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर कधी अंधेरी स्टेशनवरून घेतलेला 50 रुपयांचा टी-शर्ट असेल तर कधी कार्यक्रमासाठी मित्राकडून मागून घातलेले कपडे असतील. रुपारेल महाविद्यालयाचा जी.एस. असताना वार्षिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर सर आले होते. तेव्हा तर मी माझा रुपारेलचा मित्र केतन कांबळेचा ब्लेजर घातला होता. काल वाढदिवसानिमित्त @claiworld ne Silver leaf च्या ब्रँडबरोबर सिद्धार्थ जाधव कलेक्शन दिवाळीनिमित्त बाजारात आणलं. खरंच याच्यापेक्षा माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला अजून काय गिफ्ट हवं...’सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा आशयाच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.