२०१८ साली प्रदर्शित झालेल्या तुंबाड सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. उत्कृष्ट कथा, सिनेमॅटोग्राफी, क्लायमॅक्स आणि व्हिएफएक्समुळे हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला. या सिनेमातील पात्रही लोकप्रिय ठरली होती. या सिनेमातील हस्तर या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मायावी पण खजिना देणारा हस्तर प्रेक्षकांना भावला होता. तुंबाड सिनेमातील हस्तरची ही भूमिका मराठी अभिनेतासिद्धार्थ जाधवला ऑफर करण्यात आली होती. सिद्धार्थने तुंबाड सिनेमातील हस्तर या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. पण, काही कारणांमुळे त्याला हा सिनेमा करणं जमलं नाही.
सिद्धार्थने एका मुलाखतीत 'तुंबाड' सिनेमाचा किस्सा सांगितला होता. 'बोल भिडू'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने याबाबत भाष्य केलं होतं. "तुंबाड सिनेमासाठी मी २००३ मध्ये ऑडिशन दिली होती. दिग्दर्शक राही बर्वेने मुंबईत समर्थ व्यायाम मंदिरात ऑडिशन घेतली होती. तिकडे मी त्याला हस्तरसारखं चालून वगैरे दाखवलं होतं. नंतर त्याने व्हीएफएक्सने हस्तर अजून घाणेरडा केला. पण, मी तेव्हा तसाच होतो आणि तसाच दिसायचो. त्याने मला अंडरवेअर घालायला दिली होती. त्याला एक पिशवी बांधली होती. तो मला म्हणाला की वेगवेगळ्या पद्धतीने मला चालून दाखव. मला कळत नव्हतं की हे काय आहे. काही सिनेमात कलाकारांना कळतं की हा चित्रपट वेगळा आहे. त्यानंतर काही वर्षांनी राहीने तो सिनेमा केला", असं सिद्धार्थने सांगितलं होतं.
आता ६ वर्षांनी 'तुंबाड' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. आतादेखील 'तुंबाड' सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राही बर्वेने केलं आहे. सोहम शाहने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेता हर्ष हस्तरच्या भूमिकेत आहे. अनिता केळकर, माधव जोशी, रुद्रा सोनी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित करताच त्याच्या सीक्वलची घोषणाही करण्यात आली आहे. आता 'तुंबाड २'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत.