मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग अभिनेता सिद्धार्थ जाधव अभिनयाबरोबरच त्याच्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. सिद्धार्थने अभिनय व मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटातंही तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. आज यशाच्या शिखरावर असलेल्या सिद्धार्थला मात्र अभिनेता व्हायचं नव्हतं.
सिद्धार्थने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अभिनेता नव्हे तर पोलीस व्हायचं होतं, असा खुलासा केला. सिद्धार्थ म्हणाला, "माझा अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार कधीच नव्हता. मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं होतं. माझी सगळी तयारी ही त्यासाठीच सुरू होती. एनसीसी, फुटबॉल..हे सगळं मी त्यासाठीच करत होतो." पुढे सिद्धार्थने अभिनय क्षेत्रात येण्याबाबतही भाष्य केलं.
"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
"अशोकने मला अनेकदा पैशांची मदत केली", नाना पाटेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले "त्यावेळी..."
"मला नाटकाची आवड होती. लहानपणापासूनच माझ्यात आत्मविश्वास होता. गणेशोत्सव, आंबेडकर जयंती, दिवाळी...असे जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यात मी भाग घ्यायचो. शाळेतही मी भाग घ्यायचो. त्यानंतर मग कॉलेजमध्ये एकांकिका करायला लागलो. मी ठरवून या क्षेत्रात आलो नाही," असंही पुढे सिद्धार्थ म्हणाला. नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम करुन सिद्धार्थने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'अफलातून' चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.