केरळ येथील मलाप्पूरम येथे भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्ती मानवी वसाहतीच्या जवळ आली होती, तेव्हा स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या मनुष्य प्रजातीनं त्या आईची निर्घृण हत्या केली. काहीतरी खायला मिळेल या आशेने आलेल्या या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिले. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला.
असह्य वेदनेसह ती गर्भवती हत्ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. निलंबूर येथील वन्य अधिकारी मोहन कृष्णन यांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. हत्तींना पळवण्यासाठी फटाक्यांचा वापर ही काही नवीन गोष्ट नाही. पण या घटनेनं पुन्हा एकदा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का? याचा विचार नक्की करण्यास भाग पाडले आहे. या घटनेमुळे देशभरातील लोकांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील या प्रकरणावर प्रचंड चिडले आहेत.
याच घटनेच्या संदर्भात सुबोध भावेने एक ट्वीट केले आहे. त्याने या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ज्या प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो, त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं ते पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे.
सुबोधचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याने योग्य मत व्यक्त केले असल्याचे लोक सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.