Join us

Subodh Bhave : " ...तर तुमच्या पोटात दुखायला लागतं"; सुबोध भावे 'त्या' ट्रोलिंगवर सडेतोड बोलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 6:19 PM

Subodh Bhave : "मला त्यांना सांगायचं की बाळांनो...", सुबोध भावेनं शेलक्या शब्दात सारंकाही मुद्देसूद मांडलं

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave ) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तो उत्तम नट आहे, तितकाच उत्तम दिग्दर्शक आहे, होस्ट आहे आणि मोठा निर्माता आहे. सुबोधने आजपर्यंत विविध चित्रपटांत एकापेक्षा एक सरस  भूमिका साकारल्या. मराठी मालिकांमध्येही त्याने एक वेगळा ठसा उमटवला.  सध्या त्याच्या फुलराणी  चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात सुबोधसोबत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने स्क्रीन शेअर केलीये. यावरून काही जणांनी सुबाेधला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. या चित्रपटात स्वत:पेक्षा वयाने लहान अभिनेत्रीसोबतचा त्याचा रोमान्स अनेकांना रूचला नाही. ‘तुला पाहते रे’ मालिकेत गायत्री दातारसोबतची त्याचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहूनही सुबोध असाच ट्रोल झाला होता. अलीकडे एका मुलाखतीत सुबोध यावर बोलला.

सुबोध म्हणाला... माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम करण्यावरुन मला सर्रास ट्रोल केलं जातं. जणू काही चित्रपटासाठीचं कास्टिंग मीच करतो, माझ्याबरोबर काम कोणी करायचं हेही मीच ठरवतो आणि पात्रही मीच लिहितो. मला त्यांना सांगायचंय की, बाळांनो पात्र काय आहे, कथा काय आहे यावरुन हे सर्व ठरत असतं. ‘तुला पाहते रे’ या मालिकेदरम्यानही मला ट्रोल केलं गेलं होतं. पण त्या मालिकेची कथाच तशी होती. एक तरूण मुलगी वयस्कर पुरूषाच्या प्रेमात पडते, अशी कथा होती आणि त्यासाठी तसाच अभिनेता आणि तरुण अभिनेत्रीची गरज होती. ‘फुलराणी’बद्दलही तेच. या चित्रपटातही ‘फुलराणी’ला शिकवणारा व्यक्ती हा तिच्या वयाचा नाही. जर तिच्या वयाचा व्यक्ती हवा असता तर त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं असतं ना...

खरं सांगायचं तर मला वयाने लहान असलेल्या मुलींबरोबर काम करायला काहीही समस्या नाहीये. दिग्दर्शकांनाही कुठलीही अडचण नाहीये. खरी अडचण लोकांना आहे. सलमान खान, आमिर खान या सर्व कलाकारांनी काहीही केलेलं तुम्हाला चालतं, पण मराठी कलाकारांनी काही करायचं म्हटलं तर तुमच्या पोटात दुखायला लागतं. हीच मूळ समस्या आहे आणि ही समस्या आपल्याकडच्या बऱ्याचशा लोकांमध्ये आहे, असं सुबोध यावेळी म्हणाला.

टॅग्स :सुबोध भावे मराठी अभिनेता