गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या कल्पना करत विविध देखावे सादर केले जातात. बाप्पाच्या स्वागतासाठी खास सजावट केली जाते. आकर्षक मखर बनवलं जातं. तसंच चालू घडामोडींवर एखादा सुंदर देखावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासूनचही चर्चेतली घटना म्हणायची तर भारताची चांद्रयान मोहीम. इस्रोने 'चांद्रयान 3' ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रवेश करणारा भारत पहिलाच देश ठरला. इस्रोच्या या कामगिरीला ट्रिब्युट म्हणून मराठी अभिनेता सुबोध भावेच्या (Subodh Bhave) मुलांनी यंदा 'चंद्रयान 3' (Chandrayaan 3)चा देखावा साकारला आहे.
अभिनेता सुबोध भावेच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. आकर्षक छोटी मूर्ती आणि आणि फुलांची सजावट लक्ष वेधून घेणारी आहे. पण त्याहून खास आहे तो म्हणजे देखावा. सुबोधची दोन्ही मुलं कान्हा आणि मल्हार यांनी 'चंद्रयान 3' ची प्रतिकृती साकारली. बाप्पाच्या मागे सू्र्याचं तेज दाखवणारं मखर आहे. बाजूला पेपरने हुबेहुब यान बनवलं आहे ज्यावर ISRO असं मराठी आणि इंग्रजीत लिहिलं आहे. तर यानाच्या मधोमध तिरंगा आहे. मूर्तीच्या समोर उजव्या बाजूला शिवशक्ती पॉइंटही दिला दाखवला आहे. चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्रावर ज्याठिकाणी लँड केलं म्हणजेच पहिला स्पर्श केला तो 'शिवशक्ती पॉईंट'.
सुबोध भावेने फोटो पोस्ट करत लिहिले,'गणपती बाप्पा मोरया! यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा "चांद्रयान 3"
श्री गणेश आपल्या सर्वाना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना!
सुबोधच्या मुलांनी साकारलेल्या या देखाव्याचं खूपच कौतुक होत आहे. अतिशय समर्पक आणि समायोजित देखावा अशी कमेंट चाहत्याने केली आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन झालं असून सेलिब्रिटींच्या घरीही आकर्षक सजावट, देखावे पाहायला मिळत आहेत.