भारताने गेल्या 1 डिसेंबरला G-20 सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आणि जी-20 परिषदेच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होत आहे. एकट्या मुंबईत 8 बैठका पार पडणार आहेत तर पुण्यात 4 आणि नागपूर व औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक होतेय. जी- 20 परिषदेअंतर्गत बैठका होत असलेल्या ठिकाणी जय्यत तयारी केली जात आहेत. रस्त्यांची डागडुगी तर सुरूच आहे. शिवाय सुशोभीकरणावरही विशेष भर दिला जात आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सुशोभीकरण केलं जात आहे. आता यावरून अभिनेता सुमीत राघवनने ( Sumeet Raghavan) सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
जी-20 परिषदेच्या निमित्ताने मुंबई नववधूसारखी सजली आहे. हे पाहून सुमितने एक ट्वीट केलं आहे.
‘मुंबई महापालिकेला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की जी 20 परिषदेतील मान्यवर व्यक्ती येणार असतील तरच मुंबईकरांच्या नशिबी हे चित्र असणार आहे का? बाकी आजन्म आम्ही बोंबलतोय, विनवण्या करतोय तेव्हा ही तत्परता कुठे जाते?,’ असं सवाल सुमीत राघवनने केला आहे.
मुंबई सजलेली बघून त्याने आणखी एक ट्वीट केलं आहे. ‘जवळ जवळ आनंदाश्रू आले होते. देव करो आणि ही परिषद दर सहा महिन्यांनी मुंबईत होवो. जी 20 झिंदाबाद,’ असं त्याने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे. त्याचे हे ट्वीट सध्या तुफान व्हायरल होत आहेत. सुमीतच्या या ट्वीटवर लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.