Join us  

"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

By देवेंद्र जाधव | Published: September 29, 2024 1:11 PM

सुशांत शेलारने लोकमत फिल्मीशी बोलताना त्याचं वजन अचानक का आणि कसं कमी झालं, याचा खुलासा केलाय (sushant shelar)

'धर्मवीर २'च्या प्रिमियरवेळेस मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलार दिसला. त्यावेळी सुशांतचं कमी झालेलं वजन पाहून सर्वांनाच याबद्दल काळजी वाटली. याविषयी लोकमत फिल्मीने सुशांतशी बातचीत करुन वजन कमी होण्यामागचं खरं कारण जाणून घेतलं. सुशांतने कमी झालेल्या वजनाबद्दल योग्य असं कारण सांगितलं. याशिवाय कोणताही आजार झाला नाही, हे सुरुवातीलाच नमूद केलं. काय म्हणाला सुशांत बघा

वजन कमी होण्यामागचं नेमकं कारण काय?

सुशांत:- मला कोणताही आजार झाला नाहीय. २२ नोव्हेंबरला माझा एक 'रानटी' नावाचा सिनेमा येतोय. त्या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वप्रथम मी बारीक झालो. डाएट आणि डॉक्टरांचं व्यवस्थित मार्गदर्शन करुन वजन कमी करण्यात आलं. मी आधीच वजन कमी केलं होतं त्यात मला फूड इंफेक्शन झालं. जवळपास ४ - ५ वेळा फूड इंफेक्शन झालं. वारंवार असं होत असल्याने नेमकं कशामुळे हे होतंय ते कळत नव्हतं. त्यानंतर मी Food Intolerance टेस्ट केली. त्यामध्ये मला ग्लूटनची एलर्जी डिटेक्ट झाली. ग्लूटन म्हणजे काय? तर गहू, मैदा, पाव, ब्रेकरी प्रॉडक्ट, दुग्धजन्य पदार्थ, मशरुम, बटाटा. माझा आवडता पदार्थ आहे वडापाव. तर सध्यातरी काही महिने किंवा काही वर्ष हे पदार्थ मी खाऊ शकत नाही. आता ही एलर्जी सहा-सात महिन्यात जाते किंवा वर्षभरात जाते, हे सांगू  शकत नाही. काही महिन्यात गेली तर उत्तमच आहे. 

सध्या तब्येतीची काळजी कशी घेतोय?

सुशांत:- सध्या मी सगळीकडे चालतोय, फिरतोय. एनर्जीमध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाहीय. थोडं घटलेलं शरीर पुन्हा वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अचानक मी १० वडापाव खाल्ले आणि पटकन माझं वजन वाढलं असं होऊ शकत नाही. यासाठी माझे डॉक्टर आहेत त्यांनी डाएटसाठी काही गोष्टी सुचवल्या आहेत. वजन हे हळूहळू वाढलं पाहिजे. कारण अचानक वजन वाढून कोणताही त्रास होता कामा नये. नैसर्गिकरित्या कसं वजन वाढेल, याकडे लक्ष आहे. मी आयुर्वेद, होमिओपेथ यावर विश्वास ठेवतो. मला वेळ लागला तरी चालेल, त्यामुळे फास्ट काहीतरी करुन लगेचच वजन वाढवायचंय, असं काही नाहीय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आणि श्रीकांत शिंदेंकडून विचारपूस?

सुशांत:- कोणताही गंभीर आजार झालेला नाहीय तरीही श्रीकांत शिंदे स्वतः डॉक्टर आहेत. ते नेहमी विचारपूस करतात. डॉ. श्रीकांत शिंदेंचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम असल्याने माझ्या तब्येतीविषयी ते नेहमी चौकशी करतात. आणि मी कुठे रुग्णालयात दाखल आहे असं नाहीय. मी रोज त्यांच्याबरोबर काम करतो. प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांच्याबरोबर असतो. डॉ. श्रीकांत शिंदे नेहमीच विचारपूस करतात.

सध्या आहारात काय बदल?

सुशांत:- बाकी लोकांचं मी ऐकतो ना तेव्हा कळतं की, ग्लूटनची एलर्जी झाल्यावर त्यांना रुग्णलयात दाखल व्हावं लागलं. स्वामींच्या कृपेने मला असं काही झालं नाही. सध्या सात्विक डाएटवर आहे. घरचं खातो. बाहेरचं टाळतो मी. आपल्याकडे जे धान्य मिळतं ना त्यात रासायनिक खतं वगैरे वापरतात. त्याचेही बरेच दुष्परिणाम होतात.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपट