मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे सुव्रत जोशी (suvrat joshi) आणि सखी गोखले (sakhi gokhale) . 11 एप्रिल 2019 रोजी या जोडीने लग्नगाठ बांधत अनेकांना आश्चर्यचकित केलं. तेव्हापासून ही जोडी सातत्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच या जोडीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याविषयी आणि खासकरुन लिव्ह इन रिलेशनशीपविषयी भाष्य केलं.
लग्नापूर्वी सुव्रत आणि सखी हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय का घेतला या मागचं कारण, त्यांनी नुकतंच मुलाखतीमध्ये सांगितलं.
"साखरपुड्यानंतर आम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो. कारण, हे फार महत्त्वाचं आहे. या विषयावर (लिव्ह इन रिलेशनशीप) परेश मोकाशी यांची एक फिल्मी सुद्धा आली होती. आपण बाजारातून कोणतीही वस्तू विकत घेताना ती पारखून बघतो की ती चांगली आहे की नाही. मग, लग्न हा एवढा मोठा निर्णय आपण एकत्र न राहता कसा काय घेणार? आता लोकांना वाटेल मी फार कॉन्ट्रोवर्शल बोलतोय.पण, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की काय हरकत आहे", असं सुव्रत म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "काही वेळा काय होतं तुमचं एखाद्यावर प्रेम असतं. पण, त्या व्यक्तीसोबत सहवास नाही घडवता येत. त्यामुळे लोक असं म्हणतात की लव्ह मॅरेज का तुटतात? त्यामुळे बरेचदा असं होतं की, तुमचं एकमेकांवर प्रेम असतं पण एकत्र राहण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. तुम्हाला सहवास आणि तो सहवास करताना अनेक पद्धतीने स्वत:च्या काही सवयी बदलाव्या लागतात, आणि त्या आनंदाने बदलाव्या लागतात. त्यामुळे लिव्ह इनमध्ये राहणं आवश्यक असतं."
दरम्यान, सखी आणि सुव्रत या जोडीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे याच मालिकेच्या सेटवर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.