मराठी कलाविश्वातील अभ्यासू अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी (suvrat joshi). मालिका, सिनेमा, नाटक आणि वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते. यात सुव्रत समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर उघडपणे भाष्य करत असतो. यात अलिकडेच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टकडे सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून त्याची चर्चा रंगली आहे.
सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यात एका पोस्टमध्ये त्याने kuroop_the_play या इन्स्टा पेजवरची एक पोस्ट रिशेअर केली आहे. सोबतच या पोस्टविषयी आणि तृतीयपंथींयांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी भाष्य केलं आहे.
काय म्हणाला सुव्रत?
“तुमची राजकीय चिखलफेक चालू देत, तुमच्या कुणाकडूनही काही विधायक, प्रबोधनपर असे अपेक्षित नाहीच. आता कुणाविषयी प्रेम अथवा आदरदेखील वाटत नाही परंतु आपापसात भांडताना वर्षानुवर्षे ज्या बुरसटलेल्या धारणांनी समाजातील एका गटाला वंचित ठेवले, त्यांचे पिडन केले, किमान त्या धारणा बळकट होणार नाहीत, काही छुपे चुकीचे संदेश जाणार नाहीत ही काळजी तरी घ्या,” अशी स्टोरी सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
दरम्यान, सुव्रतने त्याच्या पोस्टच्या माध्यमातून तृतीयपंथीयांवर होणाऱ्या अन्याय आणि शोषणाबद्दल राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. सुव्रत काय स्पष्टपणे आणि बेधडकपणे त्याच मत जाहीरपणे मांडत असतो. त्यामुळे त्याची पोस्ट कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असते.