Suvrat Joshi: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा' (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 'छावा' हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. दरम्यान, या चित्रपटात बरेच मराठी कलाकार सुद्धा झळकले आहेत. 'छावा' मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अशातच 'छावा' चित्रपटात 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी देखील झळकला आहे. चित्रपटात गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिका सिनेमात अनुक्रमे सारंग साठ्ये व सुव्रत जोशी (Suvrat Joshi) यांनी साकारल्या आहेत. या सिनेमातील नकारात्मक भूमिकांमुळे हे कलाकार चर्चेत आहेत. आता याबद्दल सुव्रत जोशीने पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच सुव्रत जोशीने 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "माझ्या अनेक अमराठी मित्रमैत्रिणींनी फार प्रेमाने हा चित्रपट पाहिला. फक्त कामाचं नाहीतर सगळ्यांनीच या चित्रपटाचं कौतुक केलं. शिवाय जगभरातून अनेक लोकांनी मला मेसेज केले. जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा अनेकांनी मला विचारलं की तू ‘त चित्रपटाच्या स्क्रीनिंगला वगैरे का गेला नाहीस? पण, त्यामुळे मी दहा दिवस अॅमस्टरडॅमला होतो. तेथील नाटकाच्या महोत्सवात प्रमुख पाहुणा म्हणून मला तिकडे बोलावंल होतं."
पुढे सुव्रतने सांगितलं, " त्याचदरम्यान, तिकडे मला जवळपास ६०-७० मेसेज येत होते. अनेक मेसेज असेही होते की, आम्हाला तुझी चिड आली, तुझा राग आला. तुला अशा भूमिकेत आम्ही कधी बघितलं नव्हतं. त्या भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या. पण, मी ते खूप सकारात्मक दृष्टीने घेतलं." असा खुलासा अभिनेत्याने केला.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. विकीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. या सिनेमाने जगभरात ६०० कोटींहून अधिकची कमाई केली.