मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सर्वांचा तो लाडका अभिनेता. पण सध्या हाच स्वप्नील ट्रोल होतोय. आता कारण काय तर त्याने केलेलं एक मराठी ट्वीट. होय, स्वप्नीलने एक मराठीत ट्वीट केलं आणि तीन शब्द चुकलेत की राव....! मग काय नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच मजा घेतली. आता हे नेमकं काय प्रकरण आहे, तर ते जाणून घेऊ.
तर स्वप्नीलने नुकतंच रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा पाहिला आणि तो या सिनेमाच्या जणू प्रेमातच पडला. मग काय, कौतुक तर होणारचं. रितेश भाऊ व जिनिलिया वहिनींच्या 'वेड'चं स्वप्नीलने भरभरून कौतुक केलं.
“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन. रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!, असं ट्वीट करत स्वप्नीलने वेडच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्यात. पण आधी म्हटल्याप्रमाणे या ट्वीटमधले तीन शब्द चुकलेत ना राव... पाढते, वैनी, पाउल, हे तीन शब्द स्वप्नीलने चुकवले. मग काय नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं.
“वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका,” असं एका युजरने लिहिलं.
“अरे कसली भाषा तुमची.. वहिनी असं असतं ते..म्हणे मी पुण्याचा...”, अशा शब्दांत एका युजरने स्वप्नीलला सुनावलं.
“मराठी व्यवस्थित लिहा जोशी आधी, पाढते? वैनी? पाउल?” अशी कमेंट एका युजरने केली.
स्वप्नील सध्या वाळवी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्वप्नीलसह सुबोध भावे, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्या अभिनयाने सजलेला हा रहस्यपट त्याच्या उत्तम कथेमुळे आणि मांडणीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रेक्षक या हटके चित्रपटाला उदंड प्रतिसाद देत आहेत.