अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. 'मुंबई पुणे मुंबई', 'चेकमेट', 'आम्ही सातपुते' अशा विविध सिनेमांमधून स्वप्नील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वप्नील सध्या मराठी चित्रपटांमध्ये चांगलाच सक्रीय आहे. स्वप्नील आणि त्याचं कुटुंब श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त आहेत. स्वप्नीलच्या घरात त्याचे आई-बाबा स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करतात. याविषयी एका मुलाखतीत स्वप्नीलने खुलासा केलाय.
स्वप्नीलच्या घरी स्वामीमय वातावरण
स्वप्नील जोशीने 'आरपार' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. तो म्हणाला की, "बाबा आणि आई दोघेही स्वामीभक्त आहेत. आमच्याकडे स्वामींचं सातत्याने खूप नामस्मरण होतं. गेली अनेक वर्ष माझे आई-वडील आणि महिन्यातून एकदा त्यांचा सगळा ग्रुप जमून नामस्मरण करतात. त्यांच्या रिटायरमेंट त्यांनी हे सुरु केलं. आता हा उपक्रमही २०-२२ वर्ष सुरु आहे. माझे बाबा गेली ५० पेक्षा जास्त वर्ष रोज मठात जातात. सो ते जन्मापासून आपण बाकळडू म्हणतो ना तसं मिळालेलं आहे."
"स्वामींची भक्ती आणि घरातील देव्हाऱ्यात मूर्तीपासून सगळं आहे. त्यामुळे ही एक न विसरता येणारी आठवण आहे. हे काय कोणी शिकवलं नाहीये. म्हणजे चांगलं-वाईटचे आराखडे होतात ना तसंच हे आहे. दररोज सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो तशीच ही गोष्ट आहे. घरातील देव्हाऱ्यात स्वामींची मनापासून पूजा केली जाते. याशिवाय कोल्हापूरची महालक्ष्मी सुद्धा आमच्या देव्हाऱ्यात आहे." अशाप्रकारे स्वप्नीलने त्याला लहानपणापासून स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं बाळकडू कसं मिळालं आहे, याविषयी खुलासा केला. स्वप्नील लवकरच 'सुशीला सुजीत' या मराठी सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे.