Marathi Actor Vijay Kadam Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. गेली कित्येक दशकं त्यांनी अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही काळापासून ते कर्करोगाचा सामना करत होते. पण, अखेर आज सकाळी त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.
कॅन्सरवर उपचार घेताना विजय कदम यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, या काळात खचून न जाता त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीरपणे साथ दिली. कॅन्सरवर उपचार घेत असताना इन्शुरन्स कंपनीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांना हे पैसे मिळाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आर्थिक मदत केली होती. विजय कदम यांच्या पत्नीने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. त्या म्हणाल्या, "जेव्हा आम्हाला त्यांच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा आम्ही ते फारसे कोणाला कळवलं नाही. कारण जर बाहेर ही बातमी कळली असती तर त्यांचे विचारपूस करायला सतत फोन आले असते आणि माझा सगळा दिवस त्यातच गेला असता. पण मी विजयाच्या आजाराबद्दल त्यांचे जिवलग मित्र विजय पाटकर व जयवंत वाडकर यांना सांगितलं होतं कारण इंडस्ट्रीत त्यांचा त्रिकूट आहे. त्यामुळे त्यांना विजयच्या आजाराविषयी माहिती असलंच पाहिजे. म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली होती.
"पुढे मला मुख्यमंत्र्यांची मदत हवी होती. त्यामुळे सुशांत शेलार व मंगेश देसाई यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही मदत केली. पण, जेव्हा संकंट येतात तेव्हा ती सगळीकडून येतात. ज्यावेळी पहिला केमो करायचं ठरलं तेव्हा मी आमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवलं. नानावटीमध्ये आम्ही केमो करणार होतो आणि ते हॉस्पिटल त्यांच्या कॅशलेसच्या लिस्टमध्ये होतं. सुरुवातीला त्यांनी मला होऊन जाईल असं सांगितलं. कॅशलेस फॉर्म भरल्यानंतर फेब्रुवारीमध्ये केमो सुरू झाला. त्यानंतर कंपनीचं लेटर आलं की तुमचा इन्शुरन्स मान्य होऊ शकत नाही. कारण, त्यांना मधुमेह असल्याचं तुम्ही सांगितलेलं नाही. मी त्यांना म्हटलं की हे शक्यच नाही. त्यांना १४ वर्ष झाली मधुमेह आहे. तुमच्याकडे मी पोर्ट केलेली पॉलिसी आहे. आणि त्याच्या पहिल्या पानावरच लिहिलेलं आहे की मधुमेह आहे. तरीही त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. मग मी त्यांच्याविरुद्ध केस केली होती. केस लढल्यानंतर माझ्या बाजूने निकाल लागूनही ते पैसे देत नव्हते. मग मी फडणवीस साहेबांना जाऊन भेटले. त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मला पैसे मिळवून देण्यास मदत केली", असंही त्यांनी सांगितलं होतं.
विजय कदम हे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय होते. नाटक, सिनेमे, जाहिराती अशा माध्यमांत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. ही जाहिरात प्रचंड गाजली. विजय कदम यांनी १९८०-९० च्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे आणि टूरटूर या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या