Marathi Actor Vijay Kadam Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. गेली कित्येक दशकं त्यांनी अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही काळापासून ते कर्करोगाचा सामना करत होते. पण, अखेर आज सकाळी त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय कदम यांच्या निधनानंतर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. "तू गेलास पण कधीच विसरला जाणार नाहीस...तुझ्या आत्म्याला शांती लाभो", असं म्हणत अश्विनी भावे यांनी शोक व्यक्त केला आहे. अश्विनी भावे आणि विजय कदम यांनी 'हळद रुसली कुंकू हसलं' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमात अश्विनी भावे यांनी विजय कदम यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
विजय कदम हे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय होते. नाटक, सिनेमे, जाहिराती अशा माध्यमांत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. ही जाहिरात प्रचंड गाजली. विजय कदम यांनी १९८०-९० च्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे आणि टूरटूर या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या