मराठी मनोरंजन विश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज निधन झालं. कॅन्सरशी झुंज अपयशी ठरत विजय कदम यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातील एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. फार कमी जणांना ठाऊक असेल की विजय कदम यांच्या पत्नीही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. याशिवाय मराठी - हिंदी सिनेमांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशींसोबतही विजय कदम यांचं खास नातं आहे.
विजय कदम यांची पत्नी अभिनेत्री, तर पल्लवी जोशीसोबत खास नातं
विजय कदम यांच्या पत्नीचं नाव पद्मश्री जोशी. पद्मश्री यांनीही सिनेसृष्टीत काम करुन अनेक सिनेमे गाजवले आहेत. 'पोरीची धमाल बापाची कमाल', 'नणंद भावजय', 'थोरली जाऊ' अशा लोकप्रिय मराठी सिनेमांमध्ये पद्मश्री यांनी अभिनय केलंय. विजय यांच्या आजवरच्या कारकीर्दीमध्ये पद्मश्री यांचा त्यांना खूप आधार होता. याशिवाय विजय यांना कॅन्सरचं निदान झाल्यावर पद्मश्री खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. पद्मश्री यांची सख्खी बहिण म्हणजे अभिनेत्री पल्लवी जोशी. त्यामुळे पल्लवी ही विजय कदम यांची नात्याने मेव्हणी लागते.
विजय कदम काळाच्या पडद्याआड
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालंय. ते ६७ वर्षांचे होते. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत होते. कॅन्सरची झुंज अपयशी झाल्याने विजय कदम यांनी आज अखेरचा श्वास घेतला. अंधेरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.