नाटक, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत..., अशा आशयाची पोस्ट राजन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आणि चाहत्यांच्या काळजात चर्र झाले. मात्र हेच चाहते राजन पाटील यांच्या या पोस्टवर इतक्या त्वेषाने व्यक्त झालेत की, अखेर राजन भानावर आलेत. मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार, असे म्हणत ते पुन्हा आयुष्यातील आव्हानांना पेलण्यास सज्ज झालेत.‘नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही.तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा...’ अशी पोस्ट राजन यांनी फेसबुकवर शेअर केली.
त्यांनी ही पोस्ट का टाकली, हे माहित नाही. पण त्यांची ही पोस्ट वाचून राजन यांचे सहकलाकार, चाहते सर्वांनाच धक्का बसला. पण यानंतर या सर्वांनी राजन यांना खचून न जाता परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचा सल्ला दिला. असे निराश का होता? असंख्य नाट्यरसिकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. धीर धरा, खंबीपणे लढा. खरे योद्धे असे शस्त्र खाली टाकत नाहीत, अशा शब्दांत सर्वांनी राजन यांना समजावले. काहींनी तर अधिकारवाणीने चक्क त्यांना खडसावले. मित्रमंडळी, चाहते व रसिकांच्या या धीराच्या शब्दांनी असर केला आणि राजन खाडक्न जाग यावी तसे भानावर आलेत. यानंतर त्यांनी दुसरी पोस्ट केली. त्यांची ती पोस्ट तमाम लोकांच्या चेह-यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य देऊन गेली. राजन पाटील हे अभिनेते व लेखक आहेत. रंग माझा, माझी माणसं या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. शिवाय तरुण तुर्क म्हातारे अर्क, रायगडाला जेव्हा जाग येते, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच, तोची एक समर्थ या आणि अशा अनेक नाटक, चित्रपट व मालिकांत त्यांनी काम केले आहे.
मी पुन्हा हत्या उपसले आहे....
नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस राहत नाही. माणसाचा ऑथेल्लो किंवा हॅम्लेट का होतो याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो याला कारण त्याच्या आयुष्यातला ' तो ' क्षण. माझ्या आयुष्यात तो क्षण आला. सर्वकाही असह्य झालं. पराभव समोर उभा राहिला. आणि त्या क्षणाने घात केला.fb वर पोस्ट सोडली. कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो. लज्जित झालो. खाडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो.
स्वतःला खडसावले, ' साल्या, लोक तुला बघून, तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत. हरणारी लढाई सुद्द्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतात ही. आणि तू ? तुला लढायला हवं. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार ? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना, मग नेत्यासारखे वाग. आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही 'मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्युबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित.
मी पुन्हा हत्यार उपसले आहे. आता फक्त एल्गार !