Join us

ग्रेट! ज्येष्ठ रंगकर्मींसाठी अशोक अन् निवेदिता सराफ यांचा मदतीचा हात; सुरु केला नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 4:30 PM

Ashok saraf: ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’  असं त्यांच्या नव्या उपक्रमाचं नाव आहे

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे निवेदिता सराफ आणि अशोक सराफ (ashok saraf) .  नाटक, मालिका, सिनेमा अशा जवळपास सगळ्याच माध्यमांमध्ये काम करुन या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. गेल्या काही वर्षात अशोक सराफ यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, निवेदिता सराफ  (nivedita saraf) या आजही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत सध्या त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी राजश्री मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आणि अशोक सराफ यांनी ज्येष्ठ रंगकर्मींसाठी सुरु केलेल्या उपक्रमाविषयीची माहिती समोर आली.

'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या कलाकारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये राजवर्धन अर्थात अभिनेता विवेक सांगळे याने अशोक सराफ व निवेदिता सराफ करत असलेल्या समाजकार्याविषयी सांगितलं. ही जोडी ज्येष्ठ रंगकर्मींसाठी मोठा उपक्रम राबवत असल्याचं त्याने सांगितलं. 

"मुळात फार जास्त लोकांना याविषयी माहित नसेल पण, निवेदिता मॅडम आणि अशोक सर यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’  हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत ते ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार, बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ यांच्यापैकी ज्यांच्या घरी पैशांची अडचण आहे किंवा वयोमानामुळे त्यांना काम करणं शक्य गोत नाही अशा गरजू लोकांना मदत करत आहेत", असं विवेक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "या उपक्रमाअंतर्गत गरजू लोकांचा वैद्यकीय खर्चदेखील करण्यात येणार आहे. सुरुवात असल्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांनी काही लोकांची निवड केली आहे. भविष्यात याची व्याप्ती अजून वाढेल. हे दोघंही मोठे कलाकार आहेतच. मात्र, मोठे असूनही त्यांनी त्यांचं सामाजिक भान जपलं आहे.  येत्या २९ तारखेला या उपक्रमाचा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कार्यक्रम होणार आहे." 

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफसेलिब्रिटीनाटकसिनेमाटेलिव्हिजन