मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘माहेरची साडी’ला अभूतपूर्व यश मिळाले आणि या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या अलका कुबल या नावाला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. पण आज आम्ही अलका कुबल नाही तर त्यांच्या पतीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे फिल्म इंडस्ट्रीतील एक दिग्गज सिनेमेटोग्राफर म्हणून ओळखले जातात. अलका व समीर यांनी प्रेमविवाह केला. या प्रेमाची सुरुवात कशी झाली, हे दोघांनाही कळले नाही.
दोघांनीही पाच-सहा चित्रपट केले होते. या सिनेमात अलका व समीर दोघेही एकत्र काम करत होते. याचदरम्यान दोघेही एकमेकांत गुंतले. अर्थात माझे तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगण्याची हिंमत दोघांपैकी कुणातही नव्हती. आपले एकमेकांवर प्रेम आहे, हे जाणवत होते. पण समीर पुढाकार घेईनात म्हटल्यावर अलका यांनीच तो घेतला. किती वर्षे असे आणखी फिरायचे, आता तरी लग्न करूयात, असे अलका यांनी समीर यांना म्हटले आणि दोघांनीही आपआपल्या घरी या नात्याची कल्पना दिली.
या लग्नाला अलका यांच्या कुटुंबाकडून थोडाफार विरोध झाला. या विरोधाचे कारण म्हणजे, अलका यांनी फिल्म इंडस्ट्रीतील मुलाशी लग्न करू नये, अशी त्यांची इच्छा होती. पण अखेर हा विरोध लवकरच मावळला. दोघांचा साखरपुडा झाला आणि पुढेच चार महिन्यांनी लग्न झाले.
अलका यांनी बालकलाकार म्हणून व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘स्त्रीधन’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. ‘माहेरची साडी’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप अश्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.