RJ Amruta Deshmukh : अभिनयाशिवायही अनेक कलाकार अनेक छंद जोपासताना दिसतात. काही कलाकार वेगळं काम करतात. काही वेगळा साईड बिझनेस करतात. शेवटी काय तर संधी ‘कॅश’ करणं महत्त्वाचं. टेलिव्हिजनच्या एका अभिनेत्रीनंही अशीच एक संधी ‘कॅश’ केली आणि रेडिओ जॉकी म्हणून नावारूपास आली. होय, आम्ही बोलतोय ती अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh ) हिच्याबद्दल. मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी अमृता देशमुख हिची आता रेडिओ जॉकी ही नवी ओळख आहे. 98.3 मिर्चीमराठी एफएम वरचा तिचा ‘टॉकरवडी’ हा शो सध्या तुफान गाजतोय.
उठा उठा सकाळ झाली अमृताच्या मॉर्निंग शो ची वेळ झाली, मी अमृता देशमुख मिर्चीची ब्रँड न्यू होस्ट, मला आतापर्यंत तुम्ही फ्रेशर्स मधली परी किंवा स्वीटी सातारकरमधली स्वीटी म्हणून पाहिलं असेल पण एक सांगू का खऱ्या आयुष्यात ना मी कुणाची परी आहे ना मला स्वीटी म्हणावं एवढी मी स्वीट आहे मला वाटतं मी जरा नमकीन आहे अगदी बाकरवडी सारखी आणि म्हणूनच माझं नाव आहे टॉकरवडी असे म्हणत अमृता रेडिओजॉकी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय.
अमृता देशमुखने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलंय. स्वीटी सातारकर, फ्रेशर्स, आज्जी आणि नात, मी तुझीच रे, एक कुटुंब तीन मिनार, देवाशप्पथ, कलाकार, बाबुरावला पकडा या चित्रपट आणि मालिकांमधून अमृता देशमुखने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. झी युवा वरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत तिने साकारलेली परीची भूमिका चांगली लोकप्रिय झाली होती. अभिनयासोबतच अमृताला डान्सची आवड देखील आवड आहे. आता ती रेडिओ जॉकी या नवीन भूमिकेत चाहत्यांसमोर आलीये.