अमृता सुभाष ( Amruta Subhash) ही एक गुणी अभिनेत्री. तिची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. याच अमृतानं काही दिवसांपूर्वी प्रेग्नंसी किटचा फोटो शेअर करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या पोस्टनंतर अमृता प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती. अमृता प्रेग्नंट आहे म्हटल्यावर सगळ्यांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अर्थात असं काही नव्हतं. ही एक प्रमोशनल पोस्ट होती. ती पोस्ट ‘वंडर वुमन’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अमृताने स्पष्ट केलं होतं. ‘वंडर वुमन’ याच चित्रपटाच्या निमित्ताने आता अमृताने आई न होण्याच्या निर्णयावर मोठा खुलासा केला आहे.
होय, ‘आपलं महानगर’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता यावर बोलली. मी आणि माझा पती संदेश कुलकर्णी आम्ही दोघांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला असल्याचं तिने सांगितलं. या निर्णयामागचं कारणही तिने स्पष्ट केलं.
आम्हाला मुलं आवडत नाहीत असं नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी काम करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का? असा प्रश्न मला पडतो. बाळ आवडणं आणि त्याला जन्म देऊन त्याचं चांगलं संगोपन करणं यासाठी खूप एनर्जी लागते. ही एनर्जी आमच्यासारख्यांना इतर गोष्टींमध्ये वापराविशी वाटते. आता अनेकजण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्त्वाची व्याख्याही बदलली आहे. एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते, असं अमृता म्हणाली.
अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम तिने काम केलं. तिचं ‘ती फुलराणी’ हे नाटक तुफान गाजलं. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचं 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.