मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (amruta subhash). आजवर मराठीसह हिंदी कलाविश्वातही अमृताने अनेक नावाजलेल्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे दिग्गज कलाकारांच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. गेल्या कित्येक काळापासून अमृता कलाविश्वात अमृता सुभाष या नावाने वावरत आहे. मात्र, तिचं खरं नाव फार मोजक्या जणांना ठावूक आहे. म्हणूनच अमृताचं खरं आडनाव काय? आणि ती वडिलांचं नाव का लावते हे जाणून घेऊयात.
सध्याच्या काळात अनेक कलाकार आपल्या आईचं किंवा वडिलांचं नाव लावतात. मात्र, अमृताने हा ट्रेंड बऱ्याच वर्षांपूर्वी आणला आहे. अमृता कित्येक वर्षांपासून केवळ वडिलांचं नाव लावते. एका मुलाखतीमध्ये अमृताला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तू आडनाव का लावत नाहीस? असा प्रश्न अमृताला विचारण्यात आला होता.
"मला माझं आडनाव लावता येत नाही हे माझं हळवं दुखणं आहे. माझं आडनाव ढेंबरे आहे. पण, माझं हे आडनाव कोणीही आजपर्यंत नीट उच्चारलेलं नाही. कोणी ढगे म्हणते, कोणी ढमढेरे तर कोणी ढोले त्यामुळे आडनाव लावणं सोडून दिलं", असं अमृता म्हणाली.
दरम्यान, आज अमृता ओटीटी क्वीन या नावानेही ओळखली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून अमृता कलाविश्वात सक्रीय आहे. तिने अवघाचि संसार, झोका, पाऊल खूण या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, श्वास, सावली, हापूस, विहीर यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.