Join us  

सिनेइंडस्ट्रीत अश्विनी भावेंना आला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाल्या, "मी त्याला दोन झापड..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:27 PM

अश्विनी भावेंनी शेअर केला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, म्हणाल्या- "बड्या कलाकाराच्या सेक्रेटरीने भेटायला बोलवून..."

'अशी ही बनवाबनवी', 'शाब्बास सुनबाई', 'हळद रुसली कुंकू हसलं', 'सरकारनामा', 'घोळात घोळ' अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम करून त्यांनी ९०चं दशक गाजवलं. मराठीबरोबरच अश्विनी भावे यांनी अभिनयाने बॉलिवूडही गाजवलं. आता त्या घरत गणपती या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल त्यांनी भाष्य केलं. 

९०चं दशक गाजवलेल्या अश्विनी भावे यांनी सिनेसृष्टीत यशस्वी करिअर केलं. पण, या कारकीर्दीत त्यांना कास्टिंग काऊचसारख्या प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं. जितक्या सुंदर तितक्याच बेधडक असणाऱ्या अश्विनी यांनी मात्र या प्रसंगाचा मोठ्या धीटाने सामना केला. आणि कास्टिंग काऊचची मागणी करणाऱ्यालाही अद्दल घडवली. आरपार ऑनलाईन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला. 

"मी एकदा मोठ्या कलाकाराच्या सेक्रेटरीला भेटायला गेले होते. एका सिनेमाच्या बांधणीमध्ये ते होते. त्यांनी मला बोलवलं होतं. पण, मला एकूणच परिस्थिती लक्षात आली होती की हे कुठेतरी कास्टिंग काऊचकडे जाऊ शकतं. मी सुज्ञ आहे आणि माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती. मला माहित होतं की एका लिमिटनंतर दोन झापडात द्यायला पण मी कमी नसतं केलं. आणि हे करावचं लागतं. तुम्हाला स्वत:च तुमचं संरक्षण करायचं आहे. आणि माझी एक अशी प्रतिमा मी बनवून ठेवली होती. जी माझ्या खूप कामाला आली. लोक मला घाबरतात...लोक धजावत नाही", असं अश्विनी भावे म्हणाल्या. 

दरम्यान, अश्विनी भावे 'घरत गणपती' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या सिनेमात शुभांगी गोखले, भूषण प्रधान, निकिता दत्ता, अजिंक्य देव, शुभांगी लाटकर, संजय मोने, रुपेश बने, समीर खांडेकर हे कलाकार आहेत. २६ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.  

टॅग्स :अश्विनी भावेसेलिब्रिटी