मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री कोण असा प्रश्न विचारला तर पटकन डोळ्यासमोर अभिनेत्री दया डोंगरे यांचा चेहरा येतो. उत्तम अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीच्या खलनायिकी भूमिका विशेष गाजल्या. कुटुंबाकडून कलेचा वारसा मिळालेल्या या अभिनेत्रीने एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. मात्र, १९९० मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. त्यामुळे सध्या त्या काय करतात? कशा दिसतात असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.
अनेक वर्ष कलाविश्वात सक्रीय असलेल्या दया डोंगरे यांच्यात आला कमालीचा बदल झाला आहे. वार्धक्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना ओळखणं तसं कठीण झालं आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आजही कायम आहे.
दया डोंगरे उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिकादेखील होत्या. त्यांना गायन क्षेत्रातच करिअर करायचं होतं. त्यामुळे त्यांनी शालेय जीवनापासून शास्त्रीय तसंच नाट्यसंगीताचे धडे गिरवले होते. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. परिणामी, त्यांनी अभिनयाची साथ धरली पण गाणं मागे पडलं. अभिनयाची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या दिल्लीला रवाना झाल्या. शिक्षण चालू असतानाच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली. लग्नानंतर पती शरद डोंगरे यांची कलेच्या आवडीला खंबीर साथ दिली.
दया डोंगरे यांचे गाजलेले सिनेमा, नाटके
तुझी माझी जमली जोडी रे, गजरा, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून. अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी सोबतच आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत कि जंग अशा हिंदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या.
दरम्यान, खूप वर्षांपूर्वी दया डोंगरे यांनी अभिनयातून निवृत्ती स्वीकारली असली तरी, आजही त्यांनी निभावलेल्या भूमिकांना मराठी प्रेक्षक विसरणे केवळ अशक्यच. त्यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन २०१९ साली नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.