थायरॉईड हा गंभीर आजार आहे. या आजारात अनेकांचं वजन वाढतं तर काहींचं कमीही होतं. मराठमोळ्या अभिनेत्रीला ट्युमरच्या शस्त्रक्रियेनंतर थायरॉईडचं निदान झालं. यामुळे तिला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला यावर तिने भाष्य केलं आहे. 'वादळवाट' फेम अभिनेत्री अदिती सारंधरने (Aditi Sarangdhar) तिचा अनुभव सांगितला.
सोनाली खरेच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अदिती सारंगधर म्हणाली, "मला ट्युमर झाला होता. त्याचं ऑपरेशन केलं होतं. तर तो ट्रॅकियाच्या मागे होता. त्यामुळे ती थायरॉईडची अर्धी ग्लँड कापली आणि तेव्हापासून थायरॉईड सुरु झाला. माझा तेव्हा आवाजच गेला होता. तो हायपोथायरॉइड होता. ज्यामध्ये पटकन वजन वाढतं, सूज येते किंवा वॉटर रिटेन्शन होतं. त्यामुळे मला वर्षातले सगळेच दिवस मी काय खाते याकडे लक्ष द्यावं लागतं."
ती पुढे म्हणाली, "आठ दिवस मी जर ठराविक गोष्टी खाल्ल्या नाही तर मी लगेच फुगते.लोकांच्या शरिरात हवा असतेच तर मला सकाळी होणारे कपडे कधी कधी संध्याकाळी होत नाहीत. बऱ्याच जणांना हे खोटं वाटतं. त्यामुळे मला मी रोज काय खातीये ते बघावंच लागतं. पण कधीकधी या प्रक्रियेचा कंटाळाही येतो. किती दिवस करायचं थोडा ब्रेक घेऊ. पण हा ब्रेक जास्त झाला ना की मग आपण त्या एका ट्रॅकमधून बाहेर पडलो ना तर पुन्हा ट्रॅकवर यायला वेळ लागतो. तो वेळ मला लागतोय."
अदिती नुकतीच 'बाई गं' या मराठी सिनेमात दिसली. 'इंद्रधनुष्य' या सिनेमातही ती दिसली. 'मास्टरमाईंड','चर्चा तर होणारच' या नाटकांमध्येही तिने काम केलं. अदितीला अरीन हा मुलगा आहे.