मराठी चित्रपटसृष्टीत ९०च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनयासह त्यांच्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्या आधीप्रमाणेच सुंदर आणि चिरतरुण दिसतात. चित्रपटात त्यांचं दर्शन होत नसलं तरी मराठी तारकासारख्या कार्यक्रमात त्या आपल्या नृत्याची आवड जोपासताना दिसतात. गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाहीतर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. परवाने, तिरंगा, हस्ती, दूध का कर्ज, घर आया मेरा परदेसी अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या. मात्र या चित्रपटांना आणि वर्षा उसगांवकर यांच्या भूमिकांना म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही.
याच दरम्यानच्या काळात वर्षा उसगांवकर वादाच्या भोवऱ्या सापडल्या. एका इंग्रजी मासिकावरील त्यांनी न्यूड फोटोशूट केलं. वर्षा उसगांवकर यांचं हे न्यूड फोटोशूट रसिकांना रुचलं नाही. अनेकांनी या फोटोशूटवरुन वर्षा यांच्यावर टीकाही केली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. महाभारत या मालिकेत त्यांनी अभिमन्यूची पत्नी ‘उत्तरा’ ही भूमिका साकारली होती. चंद्रकांता या लोकप्रिय मालिकेत त्यांनी रूपमती ही भूमिका साकारली होती.