मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली नेहा प्रेक्षकांना खूपच भावली होती. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता नुकतेच तिने स्वतःचं युट्यूब चॅनेलदेखील सुरू केले आहे. यातील पहिल्याच व्हिडीओत तिने तिच्या अलिबागमधील घराविषयी सांगितले आहे.
प्रार्थना बेहरे हिने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'I Me My Self मी माझं जग आणि...' या व्हिडीओत ती सांगते की तिने आणि तिच्या नवऱ्याने अलिबागमधील घर खूप प्रेमाने बनवले आहे. हे घर तिच्यासाठी आयुष्य आहे, तिच्यासाठी एक प्रकारची शांतता आहे. या व्हिडीओत तिला प्रश्न विचारला जातो की मुंबई सोडून अलिबागला कायमचे राहायला आली आहे, तर हे किती जड गेलं?
त्यावर प्रार्थना बेहरे म्हणाली की, 'सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मला थोडा त्रास झाला. कारण सगळं काम हे मुंबईतच असतं. हे सगळं सोडून अलिबागला कायमचं इथे कसे राहायचं? कसं मॅनेज करणार मी हे सगळं? असे प्रश्न होते. पण हे खरे म्हटले तर खूप सोपे आहे. आमच्या घरापासून १५ मिनिटांवर मांडवा आहे, जिथून जेट्टी मिळते, बोट असताता आणि रो रोदेखील मिळतात. रो रो फेरीमध्ये कार टाकून ४५ मिनिटांत मुंबईला पोहोचू शकतो. म्हणजे एकंदरीत एका तासात मुंबईला पोहोचता येते. साधारण मुंबईच्या ट्राफिकमध्येही फिरायला तेवढाच वेळ जातो.
प्रत्येकाला घराजवळ समुद्र हवा असतो आणि प्रार्थनाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याबद्दल ती म्हणाली की, हो. हे पण माझ्यासाठीही हे एक स्वप्न होतं. हे ठरवून नाही केलं. याआधीही पवईला राहायचो तेव्हा घराच्या गॅलरीतून समुद्र दिसायचा. जुहूच्या घरीदेखील अगदी जवळ समुद्र होता. पण आम्ही समुद्राच्या इतक्या जवळ राहायला जाऊ असा कधीच विचार केला नव्हता. अलिबागला चालत ५ मिनिटांच्या अंतरावर समुद्र आहे. तर मी खूप नशीबवान आहे.