मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे इंडस्ट्रीसोबतच समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे भाष्य करते. यात बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, या ट्रोलर्सलाही ती सडेतोड उत्तर देते. नुकतीच हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात महिलांना वाईट भाषेत ट्रोल करणाऱ्यांचं पितळ उघडं पाडलं आहे. इतकंच नाही तर समाजात वावरणाऱ्या या लोकांना तिने घातक म्हटलं आहे.
हेमांगीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडीओवर काही ट्रोलर्सने अश्लील शब्दांमध्ये कमेंट केली. या ट्रोलर्सच्या कमेंटचा आणि अकाऊंटचा एक स्क्रिनशॉट शेअर करत तिने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. इतकंच नाही तर प्रत्येकाच्या डोळ्यात अंजनही घातलं आहे.
“Bio (इन्स्टाग्राम बायो) मध्ये लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, इंडियन आर्मी आणि प्रत्यक्षात वागतांना?? असली माणसं आतून जनावरच असतात. माणसाचं कातडं घालून समाजात हिंडत असतात!. हे कुठल्याही चित्रपट, नाटकापेक्षा घातक आहे. चित्रपट काल्पनिक असतो पण अशी जनावरं आपल्या आजुबाजूला आहेत, खरीखुरी! वार करतात आणि पकडलेही जात नाहीत. माझ्यासाठी ही हिंसाच आहे", असं हेमांगी म्हणाली.
दरम्यान, हेमांगीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर कमेंट करणाऱ्याने त्याची कमेंट डिलीट केली. मात्र, त्याचं सत्य समोर यावं यासाठी हेमांगीने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा फोटोही पोस्ट केला. अलिकडेच हेमांगी 'ताली' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.