मराठी अभिनेत्री, लेखिका मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) त्यांच्या हटके सिनेमांमुळे चर्चेत असतात. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत त्यांनी भूमिका साकारली होती. मात्र खूप कमी जणांना माहित आहे की त्या लेखिका आणि निर्मात्याही आहेत. 'चि. व चि.सौ.का', 'वाळवी', 'एलिझाबेथ एकादशी' हे चित्रपट त्यांनी काढले आहेत. तर या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांचे पती परेश मोकाशी यांनी केलं आहे.
मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचा नुकताच 'आत्मपॅम्फ्लेट' हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असूनही सिनेमाला जास्त शो मिळू शकले नाहीत. याची खंत सर्वांनीच व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटाची हवा पुण्यातच आहे का असा सवाल एकाने विचारला असता त्याला मधुगंधा यांनी उत्तर दिलं आहे.
चाहत्याने कमेंट करत लिहिले, "उत्तम मराठी सिनेमाची हवा ही पुण्याच्या बाहेर का नसते? तुमचा चित्रपट मुंबईमध्ये पाहायचा म्हणजे गनिमी कावा. थिएटर शोधा, मग विचित्र वेळेला असलेल्या शोची तिकिटं काढा, त्या वेळेत पोहचायला कष्ट घ्या आणि पोहचल्यावर शो ला कमी लोक असल्यामुळे तो रद्द नाही होणार यासाठी स्वामी समर्थांना साकडं घाला. या सर्वांमधून वाचलात तर चित्रपट पाहायचा" अशी कमेंट केली आहे.
यावर मधुगंधा कुलकर्णी यांनी नम्रपणे उत्तर देत लिहिले, "सर आम्हाला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो पण आमच्या हातात काही नाही . तरी क्षमा करा."
मराठी सिनेमांना शोज मिळत नाहीत ही नेहमीचीच तक्रार आहे. याला अनेक कारणं आहेत. ही परिस्थिती कधी सुधारणार याचीच सगळे वाट पाहत आहेत. 'वेड' सारख्या काही मराठी सिनेमांनी चांगला गल्ला जमवला. मात्र अजून बरेच चित्रपट बॉक्सऑफिसवर संघर्ष करत आहेत.