Join us

कॅब चालक २४ तासांत अटकेत, मनवा नाईकच्या पोस्टवरील विश्वास नांगरे पाटील यांची 'ती' प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 6:49 PM

मुंबई शहरात रात्री- मध्यरात्री अनेक मुलींना-महिलांना घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे मुलींनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून मनवा नाईक (Manava Naik ) मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. ‘ब्युटी विद बे्रन’ अशी ओळख असलेल्या याच मनवा नाईकसोबत अलीकडे एक धक्कादायक प्रसंग घडला. गाडी चालविताना मोबाईलवर बोलू नकोस, असे बजावल्यानंतर मनवा नाईकशी गैरवर्तन करीत तिला धमकाविल्याप्रकरणी पोलिसांनी उबर चालकाला अँटॉप हिल परिसरातून रविवारी अटक केली. मोहम्मद मुराद अजमअली इद्रिसी (वय २१) असे या चालकाचे नाव आहे.  तसेच त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मनवाच्या पोस्टवर कमेंट केली होती.

मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मनवा नाईकने तिला आलेला धक्कादायक अनुभव फेसबुकवर सांगितला होता. तिने ही पोस्ट ट्वीटरवरही शेअर केली असून यात तिने मुंबई पोलिसांना टॅग केले होते. यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “मनवा जी… आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन ८ यावर काम करत आहे. या चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल”, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले होते.

काल माझ्यासोबत घडलेल्या घटनेची मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना समन्स बजावण्यात आले आहे. मुंबई पोलीस यांचं विशेष आभार असं ट्विट मनवानं केलं आहे.  मुंबई पोलीस हे खूप सक्रिय आहेत. तसेच हे शहरदेखील खूप सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया मनवाने एबीपी माझाशी बोलताना दिली. 

"माझ्यासोबत काल घडलेली घटना फार क्वचित घडते. पण अशी घटना घडायला नको यासाठी नागरिक म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. आयुष्यात कधीतरी अशी एखादी घटना घडते. अशावेळी त्या गोष्टीचा सामना करणे गरजेचे आहे. मुंबई शहरात रात्री- मध्यरात्री अनेक मुलींना-महिलांना घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे मुलींनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच ओला-उबरसारख्या अॅपने नोकरीसाठी चालकांची निवड करताना त्यांचा योग्य तो पाठपुरावा करायला हवा. त्यांची वैयक्तिक माहिती तपासून घ्यायला हवी. त्याबरोबर नागरिक म्हणून आपणही जबाबदारीने वागले पाहिजे. म्हणजे एखादी उबर बुक करताना त्याचा जो चालक आहे. तो आपल्या अॅपवरचा चेहरा आहे का हे बघायला हवे. तसेच प्रवासादरम्यान लाईव्ह लोकेशन कुटुंबियांसोबत शेअर करावे", असेही मनवाने सांगितले आहे. 

पोलिसांकडून दखलमनवा नाईक यांनी हा अनुभव फेसबुकवर शेअर करताच सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले. परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसानी उबर चालक इद्रिसला अँटॉप हिल परिसरातून ताब्यात घेतले. 

टॅग्स :मराठी अभिनेताविश्वास नांगरे-पाटीलउबर