आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक भागांमध्ये मतदान होतंय. लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावून उभे आहेत. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री मनवा नाईकने आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. यावेळी मतदान करताना तिच्या मनात काय अपेक्षा आहेत? याबद्दल मनवा नाईकने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला.
मनवा नाईक म्हणाली की, "दरवेळची निवडणूक आपल्यासाठी एक स्क्रीनप्ले घेऊन येते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. कोविडनंतरचं हे इलेक्शन आहे. कोविडमध्ये आपल्या सर्वांना माणसं म्हणून खूप गोष्टींची जाणीव झाली. आपण ज्या वेगाने होतो त्याला कोविडमध्ये अडथळा आला. त्यामुळे आपण माणसं म्हणून खूप वेगळा विचार करायला लागलो. त्यानंतरचं हे इलेक्शन आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. एक छान, स्थिर सरकार आपल्या सर्वांनाच हवं आहे. त्यामुळे मला आशा आहे."
मनवा नाईक पुढे म्हणाली की, "मी मुख्यत्वे त्या पक्षापेक्षा त्या लीडरचा विचार करते. त्याच्या पार्टीपेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे याचा प्रामुख्याने विचार करते. माणूस म्हणून कोण उभा आहे याचा मी आधी विचार करते. त्याची पार्टी कोणती आहे याचा मी नंतर विचार करते. कारण एक विशिष्ट माणूस तुमच्या विभागात दिसतो, असतो, आपण त्यांच्यापर्यंत पोहचायचं असतं. ते आपल्याला सपोर्ट करतात. त्यामुळे मी पार्टीपेक्षा लीडरचा विचार करते."