छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा पोलीस गणवेशातील फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो तिचा आगामी प्रोजेक्टमधील आहे.
फक्त मराठी वाहिनीवर लवकरच स्पेशल पोलीस फोर्स नामक नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेची निर्मिती गिरीश स्वर करत आहेत तर दिग्दर्शन सुनील खेडेकर करत आहेत. या मालिकेत पाच पोलिसांची टीम आहे.
त्यातील एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारताना अभिनेत्री मीरा जोशी दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता संजय बोरकरही पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच मीरा पोलिसाची भूमिका साकारते आहे.
याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.'
लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.